लोकवर्गणीतून बेळकोणी खुर्द शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

नांदेड| शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बेळकोणी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकवर्गणीच्या माध्यमातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, शाळा परिसर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमासाठी गावातील विष्णुकांत अडबलवार व सचिन अनमुलवाड यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा केली. जमा झालेल्या निधीतून १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शाळेच्या परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळेतील हालचालींवर लक्ष ठेवणे सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच शिस्त व पारदर्शकतेलाही चालना मिळणार आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी ग्रामस्थांचे आभार मानले असून, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच शाळेच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!