
नांदेड | महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक एमआरआय (MRI) मशीनचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या नव्या सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना आता उच्च दर्जाची तपासणी सेवा शासकीय रुग्णालयातच मोफत उपलब्ध होणार आहे.


या एमआरआय मशीनचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबीटकर यांनी राज्यातील सात जिल्ह्यांतील एमआरआय सुविधांचे ऑनलाईन लोकार्पण केले. कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आनंद तिडके पाटील बोंढारकर, माजी आमदार अमर राजुकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना अतुल सावे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळावी हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. नव्याने सुरू झालेल्या या एमआरआय सुविधेमुळे रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज उरणार नाही. ही सेवा आजपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



नवीन एमआरआय मशीन उच्च क्षमतेचे असून मेंदू, मणका, सांधे तसेच शरीरातील अंतर्गत अवयवांचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ५ ते १० हजार रुपये खर्च येणारी ही तपासणी आता जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध राहणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी २४ तास सेवा दिली जाणार आहे. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, डॉ. राजाभाऊ बुट्टे, डॉ. पांडुरंग पावडे, डॉ. हनुमंत जाधव, डॉ. राष्ट्रपाल अवसरे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


