रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष जाळू नका; दक्षिण मध्य रेल्वेचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड| नांदेड विभागातील धेंगली पिंपळगाव – मानवत रोड रेल्वे मार्गावर २५७/८२ किमी अंतरावर लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सुदैवाने या आगीमुळे रेल्वे वाहतुकीला तात्काळ अडथळा निर्माण झाला नाही, मात्र मोठा धोका टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्राथमिक तपासानुसार, शेतातील पिकांचे अवशेष जाळल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामप्रतिनिधी आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्या समन्वयाने आग तात्काळ आटोक्यात आणण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वे रुळांजवळ पिकांचे अवशेष किंवा शेतीतील कचरा जाळणे अत्यंत धोकादायक आहे. अशा आगी वाऱ्यामुळे वेगाने पसरून ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (OHE), सिग्नल यंत्रणा, तसेच रेल्वेच्या इतर महत्त्वाच्या सुविधांचे मोठे नुकसान करू शकतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १५३ नुसार, रेल्वे सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच रेल्वे मालमत्तेच्या नुकसानीची भरपाईही वसूल केली जाईल.

रेल्वे प्रशासनाने सर्व शेतकरी व नागरिकांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करत रेल्वे रुळांच्या परिसरात सुरक्षित वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!