
नांदेड| जिल्ह्यात एचटीबीटी कपाशी बियाण्यांची साठवणूक, वाहतूक व विक्री यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले आहेत. अशा प्रकरणांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करून पोलीसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कापूस लागवडीची तयारी करत असताना बाजारात अनधिकृत व बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी महसूल, कृषी व पोलीस विभागाच्या समन्वयातून जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी किडरोग सल्ला प्रकल्पाचे पुनर्रचना, दक्षता पथकाची स्थापना, तसेच कपाशी पिकातील तण नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना लहान यंत्रे उपलब्ध करून देणे व त्याचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, क्षेत्रीय स्तरावर पथकांमार्फत तपासणी मोहीम राबविण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


अवैध कंपन्यांकडून उत्पादन वाढ व खर्च बचतीचे खोटे दावे करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात या बियाण्यांमुळे जमिनीचा पोत बिघडण्याची व पर्यावरणाला हानी पोहोचण्याची शक्यता असल्याने कोणत्याही कृषी विद्यापीठाने त्याला मान्यता दिलेली नाही.


एचटीबीटी बियाण्यात हर्बिसाइड टॉलरंट जीन असल्याने ग्लायफोसेटसारखे तणनाशक वापरल्यास तण नष्ट होते, परंतु कापूस जिवंत राहतो. हे वरकरणी फायदेशीर वाटत असले तरी त्याचे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कृषी विकास अधिकारी निलकुमार ऐतवडे, तसेच विविध तालुक्यांतील कृषी अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
