
नांदेड| राज्यातील सर्व घटकांचा विचार करून शेतकरी, रोजगार, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून ‘विकसित भारत 2047’च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.



महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, महापौर कविता मुळे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.



पालकमंत्र्यांनी सांगितले की, जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना व १६ मे ते १४ जूनदरम्यान घरनोंदणी प्रक्रिया होणार आहे. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.


राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असून शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.



जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याला ८१३ कोटी रुपयांचा लाभ मंजूर झाला असून त्याचे वितरण सुरू आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, दुपारी १२ ते ४ या वेळेत कष्टाची कामे टाळावीत व उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल-निनोमुळे यंदाच्या मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पशुधन संरक्षण व चारा टंचाई टाळण्यासाठी ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस कर्मचारी, आदर्श महसूल अधिकारी तसेच महिला व बालकल्याण आणि युवक क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, अग्निशमन दल आदींचे भव्य संचलन पार पडले. विविध पथकांनी शिस्तबद्ध मार्चपासून कार्यक्रमाला विशेष आकर्षण मिळाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला.
