भाजपाला धक्का; संग्राम हयगले एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) दाखल

बिलोली,गोविंद मुंडकर | बिलोली तालुक्यातील कासराळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम हयगले यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेना एकनाथ शिंदे गट (Shiv Sena Eknath Shinde faction) मध्ये प्रवेश केला. २७ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे बिलोली तालुक्यात भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संग्राम हयगले हे शांत स्वभाव, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जातात. भाजपात कार्यरत असताना त्यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत ग्रामीण भागात विकासकामांचा ठसा उमटवला होता. रस्ते, पाणीपुरवठा, शाळांची दुरुस्ती, अंगणवाडी सुविधा तसेच शेतकरी कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम त्यांनी राबवले होते.

मात्र, पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे नाराज झालेल्या हयगले यांनी अखेर शिवसेनेची वाट धरली. त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रवेश सोहळ्याला बालाजी पाटील खतगावकर, संपर्कप्रमुख मडावी, जिल्हाप्रमुख उमेश मुंढे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुकरराव गिरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अशोक गोपछडे, बाबुराव गोसलोड, राजकुमार गुरगुरलवार, विनोद निलावार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. हयगले यांच्या निर्णयामुळे बिलोली तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता असून, भाजपाच्या संघटनात्मक रचनेवर परिणाम होण्याची चर्चा रंगली आहे.

“शिवसेना (शिंदे गट) च्या विचारसरणीवर विश्वास ठेवून पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख काम करण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास आहे.” संग्राम हयगले, कासराळी (ता. बिलोली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!