
नांदेड | नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” ही विशेष मोहीम हाती घेतली असून, ३० एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत ती जोरदार राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अवैध मटका-जुगार, अंमली पदार्थ (NDPS) तसेच अवैध शस्त्रांवर (धारदार व अग्निशस्त्रे) कडक कारवाई केली जाणार आहे.


यापूर्वी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. तसेच अवैध अग्निशस्त्रांविरोधात एका महिन्यात ९ देशी पिस्तूल आणि ७० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. याशिवाय कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान Arms Act अंतर्गत ७० हून अधिक कारवाया करण्यात आल्या होत्या.


या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जिल्ह्यात अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात “ऑपरेशन क्रॅकडाऊन” राबविले जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, कारवाईला सुरुवातही झाली आहे.


या मोहिमेत अवैध व्यवसाय चालवणाऱ्या टोळ्यांमागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, तसेच पुरवठा साखळी (supply chain) पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जाणार आहे. सराईत गुन्हेगारांवर MPDA, MCOCA तसेच BNS कलम १११ व ११२ अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही नियोजन आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील कारवाईचा नियमित आढावा घेणार असून, मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी राहील याची दक्षता घेतली जाणार आहे.


या मोहिमेत विशेषतः तीन बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे : अवैध मटका व जुगार, अंमली पदार्थांविरोधातील कारवाई (NDPS), अवैध शस्त्रांविरोधातील कारवाई (Arms Act), दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांविषयी माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देण्यासाठी 112 हेल्पलाईन तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा पोलिसांच्या या मोहिमेमुळे गुन्हेगारीवर आळा बसून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
