नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | नांदेड शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई करत नवीन मोंढा परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून ३१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३० एप्रिल रोजी नवीन मोंढा भागातील जय गुरुदेव पान शॉपजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकण्यात आला.

छाप्यामध्ये चार जण मटका खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता १५,७७० रुपये रोख रक्कम व १५,५०० रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ३१,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान मटका अड्ड्याचे मालक अब्बास (रा. नई आबादी, शिवाजीनगर), शेख जमीर (रा. इतवारा) तसेच बुकी म्हणून संजय गायकवाड (रा. नवीन मोंढा) आणि ईश्वर जाधव (रा. खोब्रागडे नगर) यांची नावे समोर आली आहेत. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोहेका प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी पथकात सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधात माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!