
धर्माबाद | नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात अवैध गांजा लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतामधून तब्बल ७ किलो १६५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे करखेली येथील शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला.


छाप्यामध्ये आरोपी निशांत पंडीत कदम (वय ५०, रा. करखेली, ता. धर्माबाद) याच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली. उग्र वास येणारी हिरवी, ओलसर झाडे जप्त करून त्याचे वजन केले असता एकूण ७ किलो १६५ ग्रॅम गांजा असल्याचे निष्पन्न झाले.


सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत (कलम ८(क), २०(ब)) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक माधव लोणेकर व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.


नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
