नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा : अतुल सावे

नांदेड| नांदेड विमानतळ अधिक सुसज्ज व आधुनिक करण्यासाठी धावपट्टी विस्तारासह आवश्यक सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, विमानतळ संचालक अमरदीप सिंग सेहरा, संचालक व्यवस्थापक निलेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

सध्या नांदेड येथून सात ठिकाणी विमानसेवा सुरू असून लवकरच ती दहा ठिकाणी वाढविण्याचे नियोजन आहे. वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दोन ते तीन विमाने उतरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पर्यायी धावपट्टीसाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण करून नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री सावे यांनी दिल्या.

विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणारी जागा, परिसरातील उंच व अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच संरक्षण भिंतीलगतच्या भागांचे संयुक्त सर्वेक्षण महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व विमानतळ प्राधिकरणाने करावे, असेही त्यांनी सांगितले. प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी प्रवाशांसाठी अधिक सुविधा, विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करणे तसेच विमानतळापर्यंत टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!