ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर : अतुल सावे

नांदेड| इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि बहुजन समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी केले.

नांदेड येथील विष्णूनगर परिसरातील शंकरराव चव्हाण सभागृहात इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यात’ ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले की, तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. तरुणांनी रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती, वसतिगृहे तसेच ‘आधार’ योजनेद्वारे निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांसाठीही शासनाकडून पाठबळ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ‘विकसित भारत २०४७’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकास महत्त्वाचे आहेत. राज्यातील १४ महामंडळांमार्फत हजारो लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले असून, त्यातील मोठा निधी परतफेड होत आहे, ही योजनांची यशस्वी बाजू आहे. ‘महाज्योती’सह विविध कौशल्य विकास उपक्रमांतून हजारो विद्यार्थ्यांना नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी या मेळाव्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार बाबुराव कोहळीकर यांनी बँकांनी या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले तसेच वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. विविध योजनांच्या माहिती पुस्तिकांचे प्रकाशनही करण्यात आले. या मेळाव्यास नांदेडसह लातूर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!