
नवीन नांदेड | बसवेश्वर नगर, जुना कौठा येथील श्री नृसिंह नरोबा मंदिरात नृसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ३० एप्रिल रोजी पुजारी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या हस्ते विधीवत पूजा, अभिषेक, पारायण व कीर्तन कार्यक्रम पार पडले. सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले.



या प्रसंगी टाळ-मृदंगाच्या गजरात व जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मंदिर परिसरातून रविनगर मार्गे मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मिरवणुकीचे विविध ठिकाणी भाविकांनी पूजन करून स्वागत केले. जन्मोत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली.



अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २२ ते ३० एप्रिल दरम्यान श्रीराम कथा, काकडा, अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हभप सद्गुरू श्री शिवयोगी वैजनाथ स्वामी यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथा भाविकांना मंत्रमुग्ध करून गेली.


मिरवणुकीदरम्यान भाजपा नगरसेविका सुलोचना धोंडीबाराव काकडे व काकडे परिवार यांच्या वतीने भाविकांसाठी थंड मठ्ठ्याचे वाटप करण्यात आले. तसेच अमोल चक्राकार, मंगेश यादव व अमित शर्मा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


या सोहळ्यास मंदिर अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, नरोजी काकडे, विनोद काकडे, गणेश काकडे, मोहन काकडे, अशोक दुलेराव यांच्यासह विश्वस्त समिती पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्वस्त समिती, पुजारी व्यंकटेश मुळी गुरू आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, १ मे रोजी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त हभप गणेश महाराज वारंगेकर यांचे काल्याचे कीर्तन व दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
