हिमायतनगरात तीव्र पाणीटंचाई; नागरिक त्रस्त, लोकप्रतिनिधींवर निष्क्रियतेचा आरोप

लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून देणारी वामन पाटील यांची पोस्ट चर्चेत

हिमायतनगर,अनिल मादसवार | शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. तब्बल ४४ अंश सेल्सिअस तापमानात पाण्याअभावी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक वॉर्डमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे. नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करत “जनतेची सेवा करण्यासाठीच आपणास निवडून दिले आहे; कृपया जबाबदारीची जाणीव ठेवा,” अशी साद त्यांनी घातली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा झालाच नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच आमदार-खासदार यांनी तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. “ज्या वॉर्डमध्ये पाणी नाही, त्या वॉर्डच्या नगरसेवकांची ही १०० टक्के जबाबदारी आहे,” असा रोखठोक आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!