नांदेडमध्ये अवैध वाळूविरुद्ध मोठी कारवाई; 87.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलीस विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल 87 लाख 20 हजार रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पथकाला नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कल्हाळ शिवारात पाठविण्यात आले होते. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता छापा टाकण्यात आला असता, गोदावरी नदीपात्रातून इंजिन बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले.

या कारवाईदरम्यान तीन इंजिन बोटी, एक फायबर बोट, वाळूने भरलेले 34 तराफे, भारत बेंझ कंपनीचा एक हायवा, एक JCB मशीन आणि सुमारे 640 ब्रास वाळू असा एकूण 87.20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 48(7), 48(8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोकरे करीत आहेत.

या कारवाईमुळे कल्हाळ परिसरातील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. दरम्यान, महाराष्ट्र दिनापासून 1 ते 31 मे या कालावधीत नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन (मो. 9150100100) चा वापर करावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!