नांदेडमधील वाढत्या वीज तक्रारींवर महापौरांची गंभीर दखल; महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

नांदेड | नांदेड शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याने महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची आढावा बैठक घेतली.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत पार पडलेल्या या बैठकीत वीजपुरवठ्यातील अडचणी, वारंवार होणारे खंडित पुरवठे, कमी दाबाची समस्या तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापौरांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त करत महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेवक संजय मोरे, अभिषेक सौदे, राजू काळे, तुलजेश यादव, राजेश यन्नम यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता विनय घनबाहादुर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कांबळे, बळवंत बोननकर, सहाय्यक अभियंता सचिन कल्याणकर, बळीराम तोटेवाड, प्रियंका तम्मेडवार तसेच महानगरपालिकेचे शहर अभियंता सुमंत पाटील व कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके आदी उपस्थित होते.

महापौरांनी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने दुरुस्ती कामे पूर्ण करावीत, तसेच भविष्यात अशा तक्रारी कमी होण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, असे निर्देश दिले. या बैठकीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!