नीट (यूजी) 2026 परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी; नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

नांदेड | नीट (यूजी)-2026 प्रवेश परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून, परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी (ENT) करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ब्लूटूथ यांसारख्या प्रतिबंधित वस्तूंचा वापर रोखण्यासाठी ही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली मार्फत आयोजित ही परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 46 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यापैकी 24 केंद्रे शहरात तर 22 केंद्रे ग्रामीण भागात आहेत. सर्व परीक्षार्थ्यांनी सकाळी 11 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत तपासणी प्रक्रिया पार पडणार आहे.

परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग वापरला जाऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ब्लूटूथ, डिजिटल घड्याळ यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय उमेदवारांची कान, नाक व घसा (ENT) तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.

प्रतिबंधित वस्तूंमध्ये समावेश: लेखी साहित्य, कागदाचे तुकडे, कॅल्क्युलेटर, पेन ड्राईव्ह, स्कॅनर, प्लास्टिक पाऊच, लेखन पॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रात आणण्यास मनाई आहे. तसेच उमेदवारांनी ड्रेस कोडचे पालन करणे बंधनकारक असून फुलबाहीचे कपडे, जड पोशाख टाळावेत. पारंपरिक पोशाख असल्यास वेळेआधी तपासणी करून घ्यावी. प्रवेशावेळी चेहरा आणि दोन्ही कान स्पष्ट दिसतील याची काळजी घ्यावी.

याशिवाय वॉलेट, गॉगल, बॅग, बेल्ट, घड्याळ, दागिने, कॅमेरा, खाद्यपदार्थ व पारदर्शक बाटली वगळता इतर पाण्याच्या बाटल्या नेण्यास मनाई आहे. मायक्रोचिप, ब्लूटूथ यांसारखी कोणतीही लपवता येणारी साधने आढळल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व परीक्षार्थ्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!