
नांदेड | नांदेड ग्रामीण पोलीसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठी कारवाई करत सुमारे 25 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे गंगाबेट परिसरात करण्यात आली.


मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला असता, नदीपात्रात तराफे व इंजिनच्या साहाय्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच पाच अनोळखी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.


या कारवाईत 20 तराफे (प्रत्येकी 50 हजार रुपये), 5 इंजिन (प्रत्येकी अंदाजे 3 लाख रुपये) आणि सुमारे 5 ब्रास रेती असा एकूण 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नदीपात्रातील तराफे व इंजिन वाहून नेणे शक्य नसल्याने पंचासमक्ष त्यांचा नाश करण्यात आला, तर किनाऱ्यावर साठवलेली रेती जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.


या प्रकरणी अनोळखी पाच आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक केले असून, अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
