हिमायतनगरमध्ये 31 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा (इजतेमाई शादिया) उत्साहात संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर येथे समाजसेवक हाजी अब्दुल वहीद यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही (इजतेमाई शादिया) सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. रविवारी संपन्न झालेल्या या सोहळ्यात एकूण 31 जोडप्यांचा विवाह आनंदात पार पडला.

नांदेडचे रहिवासी व हिमायतनगरचे जावई असलेले हाजी अब्दुल वहीद सेठ हे होंडा कंपनीचे डीलर असून सामाजिक कार्यातही ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या तहजीब फाउंडेशनच्या माध्यमातून २००७ पासून सामूहिक विवाह सोहळ्यांचा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ५४० जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या पार पडले आहेत.

हिमायतनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात विवाह विधी मौलाना मुफ्ती उबेदुल्लाह यांनी संपन्न करून दिले, तर हाफेज अजीम साब यांनी वधू-वरांसाठी दुआ केली. या प्रसंगी वधू-वरांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष शेख रफीक सेठ, माजी उपनगराध्यक्ष जावेद सेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, हाजी युसुफ खान, अश्रफ खान, जाफर महम्मद खान, अब्दुल बाखी, अब्दुल कलीम, हनीफ सर, मनानं भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या सह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, वामनराव पाटील वडगावकर आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदविला.

या सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अलहाज अब्दुल मुबीन सेठ, मौलाना अब्दुल कुदूस कुरेशी, आमेर भाई कंपनी, शब्बीर खान, फाहद भाई आदींनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या अनेक महिन्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देणारा हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त करत सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी हाजी अब्दुल वहीद सेठ व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!