
नांदेड | जवळा देशमुख येथे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.


महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे यंदाच्या अक्षय तृतीया निमित्त नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेले तब्बल ११ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरीदेखील काही ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर येत असल्याने जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.


या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यावरील कायदेशीर बंदी याबाबत संदेश दिला. या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शिक्षिका संगिता बडवणे, शिक्षक उमाकांत बेंबडे व संतोष घटकार यांचे मार्गदर्शन लाभले.


बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ नुसार मुलाचे किमान विवाहयोग्य वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कायद्याबाबत ग्रामीण स्तरावर जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्राम विकास अधिकारी, तसेच अंगणवाडी सेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.



या पथनाट्यात तेजल शिखरे, सोनल गोडबोले, नागेश मठपती, अनन्या टिमके, मयुरी गोडबोले, शाहेद शेख, विद्या गोडबोले, विश्वदीप झिंझाडे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी गावकऱ्यांचीही उपस्थिती होती.
