विनायक नगरात वारंवार वीज खंडित; नागरिकांची महावितरणकडे तक्रार

नांदेड| शहरातील विनायक नगर परिसरात मागील अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून काही वेळा कमी दाबाने वीज येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी दाब, जुन्या व धोकादायक वीज खांबांची अवस्था तसेच तारांमधील बिघाड यामुळे परिसरातील दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

श्री विनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, विनायक नगर येथील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे.

परिसरात वीजेचा भार वाढल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असून स्वतंत्र डीपी (ट्रान्सफॉर्मर) बसवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी जुने वीज खांब आणि खाली लटकणाऱ्या तारांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी ट्रान्सफॉर्मर, वीज लाईन व फीडरची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच स्वतंत्र डीपी मंजूर करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अमरप्रीतसिंह जज, सचिव सतीश कळणे, सहसचिव बालाजी कदम, उपाध्यक्ष सरुबाई धमणे, माजी नगरसेवक आनंद जाधव, उषा तहाडे, सुजाता मारलेवाड, श्रीमती ऐकाळे, मनोहर पोहरकर, टाक, योगेश चिंतावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!