नांदेड शहरात मटका अड्ड्यावर धाड; 13 जणांवर कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) शहरातील वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, 92 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध व्यवसायविरोधी पथकाला मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, 28 एप्रिल 2026 रोजी कलामंदिर बसस्थानकाजवळील एका शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात मटका खेळताना 9 जणांना रंगेहात पकडण्यात आले.

तपासणीदरम्यान आरोपींकडून 37,600 रुपये रोख रक्कम, 26,500 रुपयांचे 7 मोबाईल फोन तसेच 28,000 रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 92,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता, मटका व्यवसायाचे मुख्य सूत्रधार म्हणून कमल यादव (दिलीपसिंह कॉलनी), अन्वर शेख (समीराबाग, खडकपुरा), माधव भुसेवाड (शिवशक्तीनगर, मिल रोड) आणि राजेश शर्मा (कलामंदिर परिसर) यांची नावे समोर आली आहेत.

या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 204/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी गणपत शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांनी संयुक्तपणे पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

 ‘खबर’ हेल्पलाइनला प्रतिसाद देण्याचे आवाहन
अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी 91 50 100 100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे गोपनीय माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!