
केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांच्या संकल्पनेतून ‘पिंक सेंटर’ उपक्रम
हिमायतनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेली इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल २०२६ रोजी हिमायतनगर तालुक्यात अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व सुरळीत वातावरणात पार पडली. या परीक्षेदरम्यान तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनारी येथील केंद्राने ‘पिंक परीक्षा केंद्र’ या अनोख्या संकल्पनेमुळे विशेष लक्ष वेधून घेतले.


शिक्षण विभाग, पंचायत समिती हिमायतनगर यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी असलेल्या या केंद्रावर सर्व महिला पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. गटशिक्षणाधिकारी केशवराव मेकाले यांच्या प्रेरणेतून आणि केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक सतीश गोपतवाड यांनी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.


परीक्षा केंद्राचे आकर्षक सजावट, प्रवेशद्वारावर नारळाच्या आवळ्यांची आरास आणि विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, यामुळे केंद्रावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता, ज्यामुळे परीक्षेचा ताण कमी होऊन आनंददायी वातावरण तयार झाले. मध्यंतरात विद्यार्थ्यांसाठी भोजन व थंड पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.


या केंद्रावर एकूण १०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पर्यवेक्षक म्हणून हिरा पोमदे, सीमाताई फुलारी, अंजू पवार, सुरेखा पाटील, प्रणिता अकोशे यांनी जबाबदारी पार पाडली, तर बैठे पथक प्रमुख म्हणून पद्माकर कुलकर्णी यांनी उत्कृष्ट कार्य केले.


परीक्षा केंद्रावर आलेल्या पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी सकारात्मकता, उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
‘पिंक सेंटर’ संकल्पनेमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश – सोनारी केंद्राच्या या उपक्रमामुळे परीक्षेला केवळ तणावपूर्ण न ठेवता, ती आनंददायी व प्रेरणादायी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असून, हा प्रयोग इतर ठिकाणीही राबविण्याची मागणी होत आहे.
