
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 10 मधील नागरिकांच्या मालमत्ता नोंदणीच्या प्रश्नावर भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी नगरपंचायतीकडे निवेदन देत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या निवेदनामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल असा ठाम विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला आहे आहे.


भाजपचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाका गल्ली व बजरंग चौक परिसरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित जागेवर वास्तव्यास असूनही त्यांच्या मालमत्तेची नोंद नगरपंचायतीच्या अभिलेखात नमुना 43 मध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे या नागरिकांना शासनाच्या घरकुल योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.


त्यांनी सादर केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित जागांची अधिकृत नोंद करून मालमत्ता कर आकारणी सुरू केल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होईल, तसेच नागरिकांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ नागरिकांच्या सोयीचा नसून प्रशासनाच्या उत्पन्नाशीही संबंधित असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.


या पार्श्वभूमीवर, नगरपंचायतीने तातडीने वस्तुस्थितीची पाहणी करून प्रभाग क्रमांक 1 व 10 मधील नागरिकांच्या मालमत्तांची नोंद अभिलेखात घ्यावी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


मागील काळात हिमायतनगर शहरात सत्तेत असलेल्या अनेक नेत्यांनी मालमत्ता धारकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मात्र या त्यांना यश आले नाही. या प्रलंबित प्रश्नासाठी मागील दोन वर्षापासून भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला नक्की येईल अशी अपेक्षा न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मालमत्ता धारकांनी व्यक्त केली आहे.
“यासंदर्भात यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तसेच आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हिमायतनगर येथील मालमत्ता धारकांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असून, हिमायतनगर नगरपंचायतीने प्रस्ताव सादर केल्यास अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या गोरगरीब मजूर वर्गाच्या घरकुलाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. या कामासाठी डॉ. राजेंद्र वानखेडे यांचे सहकार्य लाभत असून, नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांच्या सहमतीने हा प्रश्न लवकर मार्गी लावावा,” — गजानन चायल, भाजप तालुकाध्यक्ष हिमायतनगर
