
बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुक्यातील सीमा भागात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, अनेक गावांमध्ये रस्ते कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून, संबंधित गुत्तेदाराचे अधिक लाभासाठी दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.. येथील अधिकारी चांगले काम करण्याचा आग्रह धरून सुद्धा त्यांचा उपयोग शून्य दिसतो आहे.


बावलगांव येथे सुरू असलेल्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांनी याचे चित्रीकरणही केले असून, संबंधित पुरावे उपलब्ध असतानाही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येसगी येथील कामाबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.


कार्ला (बु.) येथे तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. ४०°C पेक्षा अधिक तापमान असतानाही सिमेंट काँक्रीटचे काम सुरू ठेवण्यात आले, जे तांत्रिक नियमांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशा परिस्थितीत केलेले काँक्रीटीकरण लवकर खराब होण्याची शक्यता असते, तरीही ठेकेदारांनी नियमांना जुमानले नाही, असा आरोप आहे. अभियंत्यांना भूल थापा देऊन काम सुरू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.



लघुळ येथेही कामाच्या गुणवत्तेबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणांबाबत सामाजिक कार्यकर्ते शंकर पा. कार्लेकर यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “सरकारी निधीचा अपव्यय होत असून, ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित जबाबदार धरणे आवश्यक आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.



दरम्यान, गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेची भूमिका संशयास्पद ठरत आहे. प्रत्यक्ष ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना संबंधित अधिकारी का गप्प आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. याचबरोबर निकृष्ट सिमेंटचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. आहे. ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट – जर लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. सिमेंट रस्त्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित गैरव्यवहारामुळे प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत असून, आता या प्रकरणात निर्णायक कारवाई होणे अत्यावश्यक ठरले आहे.
