
मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांचा अभिनव उपक्रम


लोहा| अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांमध्ये काहीशी साशंकता दिसून येते. मात्र, या पार्श्वभूमीवर काही जि.प. शाळा खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मागे टाकत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे पेनूर (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद हायस्कूल.


विष्णुपुरी येथील शाळेला नावलौकिक मिळवून देणारे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनी पेनूर येथील शाळेचा पदभार स्वीकारल्यानंतर शाळेचे चित्रच बदलून टाकले आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी खेळ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी उन्हाळ्यात इकडे-तिकडे भटकण्याऐवजी शाळा आणि मैदानावर आनंदाने वेळ घालवत आहेत.


या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लाठी-काठी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, रग्बी, अॅथलेटिक्स, कॅरम, बुद्धिबळ, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, शटल कॉक, रिंग आणि टेबल टेनिस अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.


राष्ट्रीय खेळाडू, पंच व प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांना राज्यस्तरीय रग्बी खेळाडू ओम साई गंगाधर शिंदे, मोहन नामदेव दुबे, श्रेयस संजय सोनवाडे तसेच क्रीडा शिक्षक मुरली ढगे यांनी सहकार्य केले.यासोबतच चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तासिका सुरू करण्यात आल्या असून, ऑनलाइन संगणक वर्गदेखील घेण्यात येत आहेत. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गंगाराम राऊत, माधव पवार, शिवाजी मोरे, अनुप कंदुलवार, बालाजी केंद्रे आणि रामलिंग नागठाणे यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 3000 रुपये किमतीचे 6×4 आकाराचे व्हाईट बोर्ड शाळेला भेट दिले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन गवते, उपाध्यक्ष चंद्रकांत एडके, गोवर्धन गवते, पत्रकार वीरभद्र एजगे तसेच मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, सहकारी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
