
नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या कृषी विक्री केंद्र बंदप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संबंधित फेडरेशनला नोटीस बजावली आहे.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत खत व बियाण्यांच्या लिंकिंग पद्धतीविरोधात स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. शेतकऱ्यांना जबरदस्तीने लिंकिंगद्वारे खत व बियाणे विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र फर्टीलायझर्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनने कृषी विक्री केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


याबाबत ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत बंदला बेकायदेशीर ठरवले आहे. “रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा असताना जाणीवपूर्वक विक्री केंद्र बंद ठेवून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.



प्रशासनाच्या आदेशानंतरही बंद पुकारणाऱ्या संबंधित संघटना व विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच तात्काळ विक्री केंद्र सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कृषी पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


