
नांदेड| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील बहुतेक तालुका कार्यकारिण्या बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. माहूर आणि अर्धापूर तालुका कार्यकारिणी वगळता उर्वरित सर्व तालुक्यांतील कार्यकारिण्यांना बरखास्त करण्यात आले असून, त्यांचे नव्याने गठन करण्यात येणार आहे.


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मान्यतेने तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे आणि कार्याध्यक्ष अनिल कसबे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी दिली.


जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवले जातात. मात्र, अर्धापूर आणि माहूर वगळता इतर तालुका कार्यकारिण्यांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने गठित झालेल्या अर्धापूर व माहूर कार्यकारिणी या निर्णयातून वगळण्यात आल्या आहेत.


दरम्यान, बरखास्त झालेल्या सर्व तालुका कार्यकारिण्यांचे नव्याने गठन करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हास्तरावरून निरीक्षक नेमले जाणार आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नव्या कार्यकारिण्या निश्चित केल्या जातील, असे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी स्पष्ट केले.


त्याचप्रमाणे, नांदेड जिल्हा डिजिटल मीडियाच्या देगलूर आणि कंधार तालुका कार्यकारिणी वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये नव्याने कार्यकारिण्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी माहिती दिली.
लवकरच तालुका स्तरावर नव्या कार्यकारिण्यांची निवड प्रक्रिया राबवली जाणार असून, पत्रकार संघाची सदस्य नोंदणीही सुरू केली जाणार आहे. दरम्यान, बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारिण्या यापुढे कोणत्याही स्वरूपात कार्यरत राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ही मोठी प्रशासकीय घडामोड मानली जात असून, नव्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
