
नांदेड/बिलोली (गोविंद मुंडकर) बिलोली तालुका सीड्स, फर्टिलायझर्स व पेस्टिसाईड असोसिएशनच्या वतीने दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विक्रेत्यांच्या बेमुदत बंद आंदोलनाला पाठिंबा देत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे.


असोसिएशनचे अध्यक्ष सत्यजीत तुपेवार, उपाध्यक्ष भागवत लोकमनवार, आदित्य बेजगमवार आणि सचिव साईनाथ मंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांना निवेदनही देण्यात आले आहे.


या बंदच्या मागे अनेक महत्त्वाचे मुद्दे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनधिकृत एचटी बीटी बियाण्यांची विक्री रोखण्याची मागणी, खत कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धती बंद करण्याची गरज, तसेच अवैध कीटकनाशके व खतांची थेट शेतकऱ्यांना एजंटमार्फत होणारी विक्री थांबवण्याची मागणी यामध्ये प्रमुख आहे.


याशिवाय, जाचक अटींमुळे विक्रेत्यांवर वाढणारा दबाव, अॅपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य करण्याचा निर्णय, किरकोळ विक्रेत्यांवर लादण्यात आलेले कडक नियम, तसेच कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी मटेरियल परत न घेण्याचा प्रश्न यावरही विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



नवीन लागू होणाऱ्या कडक कायद्यांमुळे विक्रेत्यांना होणारा त्रास, तसेच दुकानात सीलबंद कृषी निविष्ठा विक्री केल्यावरही शिक्षा होण्याची भीती या मुद्द्यांवरूनही आंदोलन तीव्र छेडण्यात आले आहे.
