नांदेडमध्ये फरार NDPS प्रकरणातील गँगस्टर अटक; पंजाब पोलिसांसह संयुक्त कारवाईत यश

नांदेड (प्रतिनिधी) NDPS (अंमली पदार्थ) प्रकरणातील फरार गँगस्टर आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई स्थानिक पोलीस आणि बाह्य राज्यातील यंत्रणांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, अरविंद घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक वटाणे तसेच पुणे डीबी पथक व खंडणी विरोधी पथकाने पंजाबमधील श्री मुक्तसर साहेब येथील CIA पथकासोबत संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत यादवइंदरसिंग उर्फ ‘याडू’ (रा. यांनाखेरा, ता. मलोत, जि. श्री मुक्तसर साहेब, पंजाब) या आरोपीस नांदेड शहरातील गुरुद्वारा देना बँक चौकाजवळील नगिना घाट रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. संबंधित आरोपी हा NDPS अंतर्गत गुन्हा क्रमांक 21/2019 (कलम 21, 25, 29) मध्ये फरार होता. त्याच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस नांदेड येथील द्वितीय दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. त्यानुसार पुढील तपासासाठी आरोपीस पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, 25 एप्रिल रोजी त्याला पंजाबकडे रवाना करण्यात आले. या धाडसी आणि यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!