
नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोठी कारवाई; 94 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड | सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठा प्रहार करत गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल 131 गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे 94 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत ही धडक मोहीम राबवण्यात आली. नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणांनी संयुक्तरीत्या या कारवायांमध्ये सहभाग घेतला. यात गुटखा प्रकरणे : 34 गुन्हे, अंमली पदार्थ प्रकरणे : 5 गुन्हे, शस्त्र कायदा प्रकरणे : 92 गुन्हे असे एकूण गुन्हे : 131 दाखल करण्यात आले असून, यात गुटखा व इतर साहित्य : ₹57,48,753, गांजा व वाहन : ₹15,87,450, घातक शस्त्रे (पिस्टल, काडतुसे, तलवारी, खंजर) : ₹20,77,280 एकूण जप्ती : ₹94,13,483 मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 4 गावठी पिस्टल, 12 काडतुसे, तसेच तलवारी, खंजर यांसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यामुळे गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



‘खबर’ हेल्पलाईनला नागरिकांचा प्रतिसाद
अवैध धंद्यांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘खबर’ हेल्पलाईन (9150100100) ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे गोपनीय माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील काळातही अशाच कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.


