
नांदेड | खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 134 कोटी 58 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजुरीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.


यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली होती, तर काही भागात जमिनीही वाहून गेल्याचे चित्र होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार चिखलीकर यांनी थेट राज्य शासनाकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.


या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी आभार व्यक्त केले.


तालुकानिहाय विमा मंजुरी :
लोहा तालुका : ₹75 कोटी 95 लाख
कंधार तालुका : ₹58 कोटी 63 लाख
एकूण मिळून ₹134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.


लोहा तालुक्यातील 78,492 तर कंधार तालुक्यातील 79,647 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. या सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला.
सध्या विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, उर्वरित रक्कम पुढील दोन दिवसांत जमा होणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आमदार चिखलीकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आभारही व्यक्त केले आहेत.
