हदगावात सामूहिक विवाह ; २९ जोडपी अडकली विवाहबंधनात, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव येथे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा वाढता भार कमी करणे आणि साधेपणातून सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणे हा होता.

या प्रसंगी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “सामूहिक विवाहासारखे उपक्रम समाजासाठी आदर्श निर्माण करणारे आहेत. अशा माध्यमातून गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळतो.”

या सोहळ्यात एकूण २९ जोडप्यांनी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला असून, उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले.

या मंगल सोहळ्याला माजी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, युवा जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, शिवसेना नेते धोंडूदादा, धोंडगे ताई यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार कोहळीकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!