उद्घाटनानंतरच कुलूप! हिमायतनगरात आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद

आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड

हिमायतनगर, अनिल मादसवार | सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मागील वर्षी हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये येणाऱ्या संभाजीनगर येथे मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेले “आयुष्मान आरोग्य मंदिर” उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवसापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल वर्षभर उलटूनही हे केंद्र बंदच असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिकांच्या मते, उद्घाटनाच्या दिवशी मोठ्या घोषणाबाजी आणि गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होण्याऐवजी दुसऱ्याच दिवशी दाराला कुलूप लागले. त्यानंतर आजपर्यंत येथे कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे “हे आरोग्य मंदिर आहे की बंद मंदिर?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आधीच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मर्यादित असताना अशा प्रकारे उभारलेले केंद्र निष्क्रिय ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे आणि दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची टीका होत आहे.

दरम्यान, या प्रकाराविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू आहे. लवकरच जिल्हा शल्यचिकित्सक (CS) यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी व जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आकाश पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जनतेपुढे आणली आहे.

“उद्घाटनापुरतेच मर्यादित राहणारे प्रकल्प आणि प्रत्यक्षात बंद पडलेली केंद्रे ही जनतेच्या पैशांची उघड उधळपट्टी आहे,” अशी टीका नागरिक करत असून, तात्काळ केंद्र सुरू करून नियमित सेवा उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!