
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| लग्नसराईचा हंगाम, पैशांची तीव्र गरज आणि त्याच वेळी चना खरेदीला अचानक ब्रेक लागल्याने कुंडलवाडी परिसरातील शेतकरी अक्षरशः अडचणीत सापडले आहेत. पणन यंत्रणा व NCCF यांच्या समन्वयाच्या अभावामुळे खरेदी प्रक्रिया ठप्प झाली असून, भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


“शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले” या कारणावर ऑनलाइन फोल्डर बंद करत खरेदी थांबवण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. सातबाऱ्याच्या आधारे सुरू असलेली खरेदी प्रक्रिया अचानक थांबल्याने हमीभावाच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. आधीच बाजारभाव अनिश्चित असताना शासनाच्या खरेदीवर विसंबून राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.


दरम्यान, वखार व्यवस्थापनावर गंभीर आरोपही पुढे आले आहेत. काही कर्मचाऱ्यांकडून “पैसे दिल्याशिवाय गाड्या रिकाम्या होत नाहीत” असा आरोप शेतकरी करत असून, पैसे न दिल्यास तासन्तास गाड्या उभ्या ठेवल्या जात असल्याची तक्रार आहे. बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याचेही स्पष्ट झाले आहे.


स्थानिक सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी सुनील बेजगमवार यांनी सांगितले की, “गेल्या ३५ दिवसांपासून बारदाना पुरवठाच नाही. त्यामुळे १५-१६ दिवस खरेदी पूर्णपणे बंद होती. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आम्ही स्वतः बारदाना खरेदी करून काही प्रमाणात खरेदी केली, मात्र प्रशासनानेच अडथळे निर्माण केले.”
यातच वेअरहाऊसकडून “शासन मान्य बारदाना नाही” या कारणावर माल स्वीकारण्यास नकार देण्यात आला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतरच माल स्वीकारण्यात आला—यातून यंत्रणांतील विस्कळीतपणा उघड झाला आहे.


जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी “उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबली असून बारदाना उपलब्ध नाही, लवकरच खरेदी पुन्हा सुरू होईल,” असे सांगत परिस्थिती स्पष्ट केली. मात्र, पैशांच्या मागणीच्या तक्रारींबाबत त्यांनी अनभिज्ञता दर्शवली. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून “हमीभावाची घोषणा एकीकडे आणि प्रत्यक्षात खरेदी ठप्प—ही दुहेरी भूमिका का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत चना खरेदी त्वरित सुरू करावी, बारदाना पुरवठा सुरळीत करावा आणि वखारातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे. आजची अडचण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महागात पडत असून, “आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न कुंडलवाडी परिसरातून उपस्थित होत आहे.
