आरपीएफ नांदेडची सतर्क कारवाई; संशयितांना ताब्यात तर ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत ४.६० लाखांचे सामान परत

नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तत्परता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत केली असून प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

पहिल्या घटनेत, रात्र गस्तीदरम्यान पूर्णा व परभणी येथील आरपीएफ तसेच जीआरपी पथकाने पोखरणी नरसिंहा रेल्वे स्थानकाजवळ गंगाखेड बाजूकडील होम सिग्नल परिसरात दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळले. चौकशीत त्यांनी आपली नावे राजू व छगन (दोघेही रा. परभणी) अशी सांगितली. संशयास्पद वर्तन लक्षात घेता पुढील कारवाईसाठी त्यांना जीआरपी परळी यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने प्रवाशांचे हरवलेले मौल्यवान सामान शोधून परत केले. दिनांक २१ एप्रिल रोजी सचखंड एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12716) च्या A-2 डब्यात तीन बेवारस बॅगा आढळून आल्या. माहिती मिळताच सेलू स्थानकावर आरपीएफ पथकाने त्या बॅगा सुरक्षित ताब्यात घेतल्या.

तपासादरम्यान या बॅगांचे मालक कदम अश्रू किसन (रा. उस्मानाबाद) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी चुकीने आपले सामान दुसऱ्या गाडीत ठेवले असल्याचे सांगितले. पडताळणीनंतर त्यांना त्यांचे सामान सुरक्षितपणे परत करण्यात आले. या बॅगांमध्ये सुमारे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ₹४.५ लाख), कपडे, चार्जर, पर्स व इतर साहित्य मिळून एकूण ₹४.६० लाखांचा ऐवज होता. या दोन्ही कारवायांमुळे आरपीएफ नांदेड विभागाची सतर्कता, कार्यतत्परता आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!