भोकर तालुक्यातील जाकापुरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

नांदेड/भोकर | भोकर तालुक्यातील जाकापुर येथे भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.

ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागरण करावे लागत असून, अनेकांना लांब अंतर पायपीट करून केवळ एक घागर पाणी मिळवावे लागत आहे. महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, दैनंदिन गरजाही भागवणे कठीण झाले आहे.

ही परिस्थिती 2026 मध्येही कायम असल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना एवढा संघर्ष करावा लागणे ही गंभीर बाब असल्याची बाब सोशल मीडियाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न श्रीधर जाधव यांनी केला आहे.

Oplus_16908288

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जलसंकट सोडवण्यासाठी कायमस्वरूपी योजना राबवावी, अशीही विनंती करण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते आणि ग्रामस्थांना दिलासा मिळवून देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!