विमानतळ पोलिसांची धडक कारवाई; अवैध खंजरासह तिघे ताब्यात, गुन्हे दाखल

नांदेड | शहरात सुरू असलेल्या स्ट्रिट सेफ्टी मोहिमेदरम्यान विमानतळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध खंजर बाळगून संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ येथे गु.र.नं. 175/2026 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच गु.र.नं. 176/2026 अंतर्गत कलम 122 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत फिर्याद पोलीस कर्मचारी हाणमंत माधवराव पाकलवाड यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान माळटेकडी ब्रिज परिसरात एक इसम अवैध हत्यारासह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित सुनिलसिंग दर्शनसिंग दुधानी (रा. भारत कॉलनी, अहमदपूर, जि. लातूर) याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी खंजर जप्त करण्यात आला.

तसेच पुढील गस्तीदरम्यान माळटेकडी परिसरात अंधारात संशयास्पद हालचाली करत बसलेल्या अर्जुनसिंग धारासींग दुधानी व किरपालसिंग गुरुवच्चनसिंग दुधानी (दोघे रा. साखला प्लॉट, परभणी) या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही काही गैरकृत्याच्या उद्देशाने थांबले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स.पो.नि. भागवत नागरगोजे, पोउपनि खंडू दर्शने तसेच स्ट्रिट सेफ्टी पथक व विमानतळ पोलिसांचा सहभाग होता. सदर कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!