भोकरमध्ये जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण; शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धतेवर भर

भोकर/नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल.” सहकार चळवळीचा वारसा जपत सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भूषवले. यावेळी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी श्यामराव कदम आणि अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी सहकारी बँकांच्या कामकाजातील अडचणींचा उल्लेख करत, त्या पार करून नांदेड जिल्हा बँकेने प्रगती साधल्याचे सांगितले. भविष्यात पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य खत व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या पुनरुत्थानातील आपला सहभाग सांगताना, बँक बंद होण्याच्या उंबरठ्यावर असताना तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात १२५ कोटींच्या कर्जाचे अनुदानात रूपांतर झाल्याने बँक वाचली, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी तर आभार प्रदर्शन संचालक रामचंद्र मुसळे यांनी केले. नवीन इमारतीमुळे भोकर परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!