
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ मधील पिक नुकसानीसाठी तब्बल ८१३.९३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. या रकमेचे वितरण २१ एप्रिल २०२६ पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुरू झाले आहे.


नांदेड जिल्ह्यातील ४ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांनी एकूण ८ लाख २९ हजार ७३७ विमा अर्ज दाखल केले होते. सुमारे ५ लाख १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७ लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


या नुकसानीत सोयाबीन, मुग आणि उडीद या पिकांचा सर्वाधिक फटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली असून सोयाबीन, मुग व उडीद पिकांसाठी ही मोठी रक्कम मंजूर झाली आहे.


खरीप हंगाम २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्न पद्धतीनुसार विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३३१२ पिक कापणी प्रयोग (CCE) नियोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून हे प्रयोग पार पडले. CCE मोबाईल अॅपच्या माध्यमातून हे प्रयोग पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यात आले.


दरम्यान, पिक विमा कंपनीकडून घेण्यात आलेले आक्षेप निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निकाली काढले. त्यामुळे नुकसानभरपाई मंजुरीचा मार्ग मोकळा झाला.
मंजूर रक्कम DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आधार क्रमांक व OTPच्या माध्यमातून स्वतःची मंजूर रक्कम तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
