नांदेड : ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद

नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गाजलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीसह आणखी एक आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) नांदेड यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 172/2026 अंतर्गत विविध कलमांन्वये नोंद असलेल्या या प्रकरणातील आरोपी साई ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (वय 26) आणि नितेश परमेश्वर इंगळे (वय 22, दोघेही रा. नांदेड) हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते.

दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री कॅनल रोड परिसरात जुना वाद उफाळून आल्याने प्रफुल उर्फ अजितसिंग गजानन चक्षाण यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता.

तपासादरम्यान नांदेड, सोलापूर आणि पुणे येथे शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भिसे यांना 21 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली की आरोपी वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे लपून बसले आहेत. त्यानुसार पोलीस पथक तात्काळ वाराणसीकडे रवाना झाले.

वाराणसी येथे पोहोचल्यानंतर स्थानिक पोलीसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच 22 एप्रिल रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना भाग्यनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर मुख्य आरोपीने वाराणसी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केल्याच्या बातम्या फिरत होत्या. मात्र प्रत्यक्षात तो स्वतःची ओळख लपवून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, हे तपासात उघड झाले.

या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पथकाचे कौतुक केले असून वाराणसी पोलीसांचेही आभार मानले आहेत. तसेच त्यांना प्रशंसापत्र देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!