परभणीत पोलीस उप महानिरीक्षक पथकाच्या धाडी; मटका अड्ड्यांवर कारवाई, दहा आरोपी जेरबंद

परभणी/नांदेड| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने परभणी शहरात धाडसी कारवाई केली. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून एकूण दहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता मार्केट व जुना मोंढा परिसरात शटरआड सुरू असलेल्या मटका व्यवसायावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत २४,९९० रुपयांची रोकड व सुमारे २५ हजार रुपयांचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर रासवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्मशानभूमी रोडवरील एम.आर. हॉटेल येथेही मटका अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. येथे ७,९२० रुपयांची रोकड व ११ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ताटीकुंडलवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३२,९१० रुपयांची रोकड, सात मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ६८,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

‘खबर’ हेल्पलाइनचे आवाहन : अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांनी पुढाकार घ्यावा यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून ९१५०१००१०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!