
लोहा| लोहा तालुक्यात जनगणनेच्या कामाला १६ मेपासून सुरुवात होणार असून यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.


पहिल्या टप्प्यात घरगणना केली जाणार असून प्रत्यक्ष कुटुंब सदस्यांची गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार आहे. जनगणनेच्या कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पारडी (ता. लोहा) येथील सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये २७ एप्रिलपासून प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. हे प्रशिक्षण तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २७ ते २९ एप्रिल दरम्यान १५० कर्मचाऱ्यांसाठी, दुसरा टप्पा ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान (सुट्टी वगळून) १५० कर्मचाऱ्यांसाठी, तर तिसरा टप्पा ४ ते ६ मे दरम्यान २०० कर्मचाऱ्यांसाठी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी आठ प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.


दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या ५८ कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष घरांची नोंदणी करण्यात येणार असून त्यासाठी ३३ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. प्रगणक घरोघरी जाऊन कुटुंब प्रमुखांकडून माहिती घेणार असून ही माहिती मोबाईलद्वारे डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे.तहसीलदार परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पाठक, विभाग प्रमुख के. आर. खोडवे, ईश्वर धुळगंडे, मळगे आणि त्यांची टीम प्रशिक्षणासाठी परिश्रम घेत आहे.


नगरपालिकेतही प्रशिक्षण सुरू – नागरी भागातील जनगणनेची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांकडे असून लोहा नगरपालिकेत २३ ते २५ एप्रिल दरम्यान तीन दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना अभियंता कठारे, संगणक प्रमुख सुतार, निलेश चव्हाण व सहकारी प्रशिक्षण वर्गाचे काम पाहत आहेत.
