
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीचे नामकरण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करून तेथे सांस्कृतिक सभागृह, वाचनालय व अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी समाज विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.


नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गंगाधर मामीडवार सावकार यांनी दान दिलेल्या जागेत १९९० ते १९९५ या कालावधीत समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व समाजासाठी सार्वजनिक वाचनालयही सुरू करण्यात आले होते.


नंतर हिमायतनगर येथे न्यायालयास मंजुरी मिळाल्यानंतर जागेअभावी हे समाजमंदिर ग्रामपंचायत कार्यालयासाठी वापरण्यात आले. त्यामुळे वाचनालय बंद पडले. आता नगरपंचायत कार्यालय अन्यत्र स्थलांतरित झाल्याने ही इमारत पुन्हा समाजाच्या उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


या इमारतीचे दुरुस्ती व सुशोभीकरण करून ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह’ तसेच अभ्यासिका सुरू करावी, जेणेकरून सर्व समाजातील नागरिकांना त्याचा लाभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


ही मागणी परिषदेचे अध्यक्ष सिद्धांत परमेश्वर बनसोडे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, कार्याध्यक्ष आकाश विश्वनाथ बनसोडे, सचिव रमेश उत्तम पंडित, माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांच्यासह विविध पदाधिकारी व समाजबांधवांनी केली आहे.
