नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; पाच जुगाऱ्यांवर गुन्हा, ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड| नांदेड ग्रामीण पोलीस यांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान छापा टाकत पाच जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तब्बल ४ लाख ७२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाउन’ अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापासून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले.

२३ एप्रिल रोजी पहाटे सुमारे १२.२० वाजता वाजेगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाजेगाव–मुदखेड रोडवरील आर.के. पेट्रोल पंपाजवळ मुरादकोल डेपोसमोरील मोकळ्या जागेत छापा टाकला. येथे काही इसम ‘तिरट’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण ४.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड तसेच अंमलदार अर्जुन मंडे, कल्याणकर, पवार व सिरमलवार यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!