
नांदेड/नायगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुंटूर तांडा येथे डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी जिल्हास्तरीय पथकासह मंगळवारी (दि. २२ एप्रिल) भेट देत परिस्थितीची पाहणी केली.


या भेटीदरम्यान पथकाने संशयित रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी केली तसेच ताप रुग्णांचे सर्वेक्षण, अबेटिंग आणि किटकशास्त्रीय सर्वेक्षणाची मोहीम राबवली. काही रुग्ण नांदेड येथे उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.



आरोग्य विभागाने ग्रामस्थांना डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या. परिसर स्वच्छ ठेवणे, नाल्या वाहत्या ठेवणे, घरातील पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवणे (ड्राय डे) तसेच डेंग्यूची लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांसोबत कॉर्नर बैठक घेऊन आरोग्य शिक्षणही देण्यात आले.



तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गावात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी डॉ. श्रीकांत पटवेकर, डॉ. अमोल उडतेवार, आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, विलास चव्हाण तसेच आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


आरोग्य विभागाच्या या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
