
नांदेड (प्रतिनिधी) शब्दांची शस्त्रे हातात घेऊन समाजहितासाठी अविरत लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होताना अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी तसेच राज्य शासनाच्या अधिस्वीकृती मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष आणि मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी यांना ‘झुंजार पत्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.


हा प्रेरणादायी सोहळा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात पार पडला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना विजय जोशी यांनी सांगितले, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, समाजाने ठेवलेला विश्वास अधिक जबाबदारीने पेलण्याचा प्रयत्न करीन. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून कार्य करणार आहे.”


यावेळी निखिल लातूरकर यांनीही समाजासमोरील वास्तव मांडत गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन केले.


या कार्यक्रमास किरण कुलकर्णी, बजरंग शुक्ला, प्रल्हाद कांबळे, संतोष कुलकर्णी, प्रशांत गवळे, कृष्णा उमरीकर आणि रमेश देवडे यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले. सन्मान, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा संगम घडविणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
