
शुक्रवारी शहर बंदची हाक, प्रशासनावर संतापाचा स्फोट!


हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.


यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मुन्नाभाऊ उर्फ माधव शिंदे यांनी दिनांक 21 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे आहे.


एव्हडंच नाहीतर यापूर्वी दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष करत नगरपंचायतीने उपोषण सुरु होताच गावाबाहेर जागा देण्याचे पत्र काढल्याने “ही शिवरायांची थट्टा” असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तालुकाध्यक्ष माधव उर्फ मुन्नाभाऊ शिंदे यांनी २१ एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, “शहराच्या मध्यभागीच पुतळ्यासाठी जागा मिळाली नाही, तर उपोषण सुरूच राहील” असा ठाम इशारा दिला आहे.


आंदोलनाला आणखी धार देत २४ एप्रिल रोजी हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रसिद्ध रील स्टार भाऊ कदम यांनीही प्रशासनावर थेट निशाणा साधत इशारा दिला आहे. “यावेळी विषय टाळण्याचा प्रयत्न करू नका… अन्यथा अशी आग लागेल की विझवणे कठीण जाईल,” असे ते म्हणाले.

या प्रकरणी तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अवधूत पाटील एकंबेकर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर प्रहार संघटनेचे हदगांव हिमायतनगर विधानसभा संघटक दत्ता देशमुख यांनी देखील शहर बंदचे निवेदन दिले असल्याने शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जागेचा प्रश्न आता केवळ मागणीपुरता न राहता जनआंदोलनाचे रूप धारण करत असल्याचे चित्र हिमायतनगरमध्ये पाहायला मिळत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष शेख रफिक शेख महबूब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही
