
नांदेड (प्रतिनिधी) खडतर, साहसी आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी अमरनाथ यात्रा यंदा ३ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सलग २६ वर्षांचा यशस्वी अनुभव असलेल्या या यात्रेचे हे २७ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या केवळ १० जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असून भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य याच पवित्र गुहेत सांगितल्याची श्रद्धा आहे. या गुहेत दरवर्षी नैसर्गिकरीत्या बर्फाचे शिवलिंग तयार होते, जे या यात्रेचे प्रमुख आकर्षण मानले जाते.


यंदाची अधिकृत यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली आहे. या यात्रेसाठी १३ ते ७० वयोगटातील निरोगी व्यक्तींना सहभाग घेता येतो. यात्रेपूर्वी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असून त्यानंतर Punjab National Bank येथे अधिकृत नोंदणी करावी लागते.


नांदेड येथून सुरू होणाऱ्या या यात्रेत धार्मिक व पर्यटन स्थळांचा समृद्ध अनुभव मिळणार आहे. यात्रेदरम्यान वैष्णोदेवी मंदिर येथे दर्शन, सुवर्ण मंदिर भेट, दिल्ली मधील ऐतिहासिक स्थळे, श्रीनगर येथील निसर्गसौंदर्य, सोनमर्ग व गुलमर्ग येथील रमणीय परिसर, खीर भवानी मंदिर तसेच अटारी बॉर्डर येथील बीटिंग रिट्रीट सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी व शारीरिक-मानसिक तयारीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय मैदानावर दररोज चालणे, प्राणायाम, योगाभ्यास व व्यायामाचे प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या २६ वर्षांत एकही दुर्घटना घडली नसल्याने या यात्रेची विश्वासार्हता अधोरेखित झाली आहे.
“ना नफा, ना तोटा” या तत्वावर आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रेत सहभागी भाविकांसाठी १३ दिवस मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात येते. तसेच निवास, प्रवास, सुरक्षा व मार्गदर्शनासाठी अनुभवी स्वयंसेवक सतत सेवेत असतात. ही यात्रा धार्मिक अनुभवाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता, निसर्गसौंदर्य आणि सामाजिक बंधुभावाचा संगम घडवणारी ठरते. इच्छुक भाविकांनी भाऊ ट्रॅव्हल्स, कला मंदिर समोर, नांदेड येथे संपर्क साधून आपली नोंदणी लवकरात लवकर निश्चित करावी, असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
