
नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत 10 घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला असून सोन्या-चांदीसह एकूण 78 लाख 35 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


या प्रकरणात भा.न्या.संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेजने तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक शशांत एन.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


पोलीस निरीक्षक संतोष तांबे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बाजी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद देशमुख व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सोशल मीडियावर फरांदे नगर परिसरातील चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण (CDR, डम्प डेटा) यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपींना बाबानगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी विविध भागात घरफोडी करून चोरीचा माल इतर आरोपींना विकल्याची कबुली दिली.


या आरोपी सोहेल अब्दुल सत्तार (वय 19, रा. जवाहरनगर), प्रदीपकुमार विरेंद्रप्रसाद कोरी (वय 19, रा. धनेगाव, बळिरामपूर), अर्जुन पुरुषोत्तम मोरे (वय 28, रा. चौफाळा मरघाट), शेख नईम शेख मेनुद्दीन (वय 22, रा. कोलासनगर), आशा हरिचंद्र तेलंग (वय 56, रा. शाहूनगर), तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे. यांच्याकडून सोन्याचे दागिने : 44.5 तोळे (अंदाजे ₹68,80,850), चांदीचे दागिने : 171.4 तोळे (अंदाजे ₹4,54,210), एक मारुती कार, 3 मोटारसायकली व इतर साहित्य : ₹5,00,000 असा एकूण मुद्देमाल ₹78,35,060 जप्त केला आहे.


या आरोपींनी भाग्यनगर, शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत एकूण 10 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
