धम्म निरंजन विपश्यना केंद्र व लोकमत प्रेस येथील चोरीचे दोन गुन्हे उघड; 58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) धम्म निरंजन विपश्यना केंद्र तसेच एमआयडीसी परिसरातील लोकमत प्रेस कार्यालय येथे झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा करत 58,600 रुपयांचा 100 टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणात वजीराबाद पोलीस ठाणे गु.र.नं. 37/2026 (कलम 303(2) भा.न्या. संहिता-2023) तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे मुर.नं. 61/2026 (कलम 103(2) भा.न्या. संहिता-2023) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी तपासाची सूत्रे हाताळली.

दि. 20 एप्रिल 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, चोरी करणारा आरोपी नेकलेस रोड, केळी संशोधन केंद्र परिसरात आपल्या साथीदारासह चोरीचा माल वाटून घेत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजू श्रावण पवार (वय 26, रा. चौफाळा, नांदेड), मोहम्मद सईद मोहम्मद युसुफ (वय 65, व्यवसाय भंगार, रा. इतवारा, नांदेड) या आरोपींना ताब्यात घेतले. 

चौकशीत आरोपी राजू पवार याने धम्म निरंजन विपश्यना केंद्रातून साहित्य तसेच एमआयडीसी येथील लोकमत प्रेस परिसरातून लोखंडी व भंगार साहित्य चोरी करून ते मोहम्मद सईद यांच्या भंगार दुकानात विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांतील एकूण 58,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडे सोपविण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!